सामाजिक

शासन आले दारी , अन मिळाली नोकरी

Spread the love
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्षात लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. विविध सेवा आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच रोजगार मेळाव्याचे आयोजन करून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली.
अभियानाच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्याला अनेक बेरोजगार युवक-युवती रोजगाराचे स्वप्न घेवून येत असतात. शासनातर्फे विविध नियोक्त्यांशी संपर्क साधून त्यांना या मेळाव्यासाठी आमंत्रित केले जाते. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेवून जागेवरच निवड होत असल्याने आपले ज्ञान आणि कौशल्य उत्तमरितीने मांडून नोकरी मिळविण्याची ही एक चांगली संधी युवकांना असते.
  मेळाव्यात उपस्थित अनेक बेरोजगार तरुणांपैकी एक असलेल्या हवेली तालुक्यातील देहूरोड येथील आकाश कांतिलाल वाघमारे यालाही यानिमित्ताने रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आणि त्याने चांगली मुलाखत देत संधीचे यशात रुपांतर केले. बीव्हीजी कंपनीतर्फे त्याला पे रोल एक्झेक्युटीव्ह या पदावर नोकरीची संधी मिळाली आहे.
आकाश वाघमारे यांचे बी.ए. डी.एड पर्यंत शिक्षण झाले आहे. मूळ पंढरपूर तालुक्यात मौजे होळे बु. चे असणारे आकाश नोकरीच्या निमित्ताने पुण्याला स्थायीक झाले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतू त्यांना म्हणावे असे यश लाभत नव्हते. वडिल मजुरी करत असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत होते. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागावा यासाठी ते नोकरीच्या प्रतिक्षेत होते. सुरवातीला कुटुंबाला मदत व्हावी म्हणून त्यांनी पंढरपूर येथील लोटस इंग्लिश स्कूल या ठिकाणी कंत्राटी स्वरुपातील नोकरी केली. तसेच काही दिवस छायाचित्रकाराचा व्यवसायही केला, परंतू तो चालला नाही. यात उत्पन्न कमी असल्याने त्यांना इतर ठिकाणी नोकरी शोधण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
वाघमारे यांना जेजूरी येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा भरणार असल्याची माहिती मिळाली. या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी महास्वयम् पोर्टलवर नोंदणी करुन ते मेळाव्याला हजर राहीले. या ठिकाणी विविध कंपन्याचे नियोक्ते उपस्थित होते. भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया या एकात्मिक सुविधा व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद सेवा, घनकचरा व्यवस्थापन आणि विशेष प्रकल्पांचा समावेश असणाऱ्या आघाडीच्या कंपनी पे रोल एक्झेक्युटीव्ह पदासाठी त्यांनी मुलाखत दिली. या पदासाठी त्यांची निवडही झाली.
पूर्वी कंत्राटी तत्वावर काम असल्याने सतत नोकरी जाण्याची भिती होती. आता नोकरीची शाश्वती असल्याने त्यांना भविष्यातील प्रगतीची संधी जणू उपलब्ध झाली आहे. जेजूरी येथील मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शासन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दारी आल्याने आकाश यांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
*आकाश वाघमारे:* शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतू मला यश मिळत नव्हते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे समाजाला शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असून लाभही एकाच ठिकाणी देण्यात येत आहेत. शासनाचा हा उपक्रम खुपच वाखाणण्याजोगा आहे. पंडीत दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून खुप बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत आहे. यासारख्या रोजगार मेळाव्यांचे आयोजन सातत्याने होणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×