पिंपरी चिंचवडआंतरराष्ट्रीय

ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान

Spread the love

पिंपरी :- महापालिकेच्या वतीने  राबविण्यात आलेल्या नवी दिशा या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून प्रतिष्ठीत समजला जाणारा ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराला सन्मान पदकाने गौरविण्यात आले. चीनमधील ग्वांगझू येथे ग्वांगझू सचिवालयात हा सन्मान सोहळा पार पडला. महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, समुह संघटिका वैशाली खरात आणि सीटीओच्या प्रज्ञा ठाकूर यांनी आयुक्तांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. नागरी सहभाग आणि सहकार्यामुळे महापालिकेला मिळालेला हा बहुमान असून शहरवासीयांप्रती आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कारप्राप्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या वतीने नवी दिशा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून शहरातील सामुदायिक शौचालयांचे देखभाल करण्याचे काम आर्थिक मोबदला  देऊन महिला बचत गटांना देण्यात येत आहे. यामुळे महिलांना आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये ५४ देशांतील १९३ शहरांचा समावेश होता, यामध्ये पिंपरी चिंचवड शहराने नाविन्यपूर्णता, परिणामकारकता आणि शाश्वत शहरी विकासासाठी असलेली आपली वचनबद्धता दर्शवली. नवी दिशा उपक्रमाद्वारे महापालिकेने स्वच्छतेसोबत शहरातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देत कार्यक्षम प्रशासनाचे यश देखील अधोरेखित केले.

दिनांक ११ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश असलेल्या एका तांत्रिक समितीने पिंपरी चिंचवड शहरातील नवकल्पना, परिणामकारकता, संदर्भ आणि प्रतिकृती यांसारख्या निकषांचे मुल्यमापन केले.

अंतिम १५ निवडलेल्या शहरांमध्ये पिंपरी चिंचवड, भारत; अंतल्या, तुर्किये; बोगोटा, कोलंबिया; केप टाउन, दक्षिण आफ्रिका; ग्वांगजू, कोरिया; हलांद्री, ग्रीस; इज्तापालापा, मेक्सिको; जकार्ता, इंडोनेशिया; कंपाला, युगांडा; कझान, रशिया; मॅनहाइम, जर्मनी; रामल्लाह, पॅलेस्टाईन; साओ पाउलो, ब्राझील; तेहरान, इराण; आणि क्सियानिंग, चीन या शहरांचा समावेश होता.

पिंपरी चिंचवड शहराला मिळालेल्या या सन्मानाबद्दल बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहराला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे महापालिकेने परिवर्तनशील शहरी विकासाकडे टाकलेले एक पाऊल आहे. महिला बचत गटांच्या प्रयत्नातून चालवलेला नवी दिशा उपक्रम सर्वसमावेशक वचनबद्धतेचे आणि शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड शहराला मिळालेल्या या जागतिक मान्यतेमध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व भागधारकांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे. नवी दिशा उपक्रमामध्ये अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्याचा आणि येत्या काही महिन्यांत लाभार्थ्यांची संख्या तीन पटीने वाढवण्याची योजना महापालिका आखत आहे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
शहरातील विकासकामांसाठी गरज कालबद्ध नियोजनाची!
विकसित भारत संकल्प यात्रेचा नागरिकांनी घेतला लाभ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×