पिंपरी चिंचवडपुणे

मानवी जीवनात संस्काराला खूप महत्त्व – ह.भ.प. किसन महाराज चौधरी

शिक्षण प्रसारक मंडळाच्या निगडी शाळेत कार्तिकी एकादशी निमित्त प्रवचन

Spread the love
पिंपरी :- मानवी जीवनात संस्काराला खूप महत्त्व आहे. संस्कार हे आई, वडील, गुरु, मित्र आणि संत महात्म्यांच्या सानिध्यातून तसेच वाचनातून होत असतात. दूध आणि पाणी एकत्र केले असतानाही दूध पितो त्यालाच ‘राजहंस’ पक्षी म्हणतात. कावळा आणि कोकिळेचा रंग काळा असतो. परंतु वसंत ऋतूमध्ये जो पक्षी गातो त्यालाच कोकिळा म्हणतात. शिक्षकांनी शिकवलेल्या प्रत्येक धड्यात, कवितेत प्रश्न उत्तरांपूर्तेच न पाहता त्यामध्ये मूल्य असतात या दृष्टिकोनातून पाहावे. मानवी जीवनात ही मूल्य च आपल्यावर संस्कार करीत असतात असे मार्गदर्शन ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या निगडी शाळेत आळंदी यात्रा आणि कार्तिक भागवत एकादशी निमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन केले होते. शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. वारकरी आणि भागवत संप्रदायाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी तसेच महाराष्ट्रातील संतांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि याद्वारे त्यांच्यावर संस्कार घडावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ह.भ.प. दिगंबर महाराज ढोकले, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी उपस्थित होते. वारकरी पोशाखातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात म्हटले आहे, ‘जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। भूतां परस्परे जडो। मैत्र जिवांचे।।’  दुष्टां मधील दुष्टपणा जावा आणि चांगले गुण आपल्यामध्ये यावेत अशी भावना ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानाद्वारे व्यक्त केली आहे. रावण दुष्ट नव्हता तर रावणातील प्रवृत्ती दुष्ट होती‌. हंस केवळ पाण्यातील दूध पितो. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करावे. त्यातून पुढील जीवनाचा प्रवास सुखकर होतो, असे किसन महाराज यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
शिक्षिका स्नेहल देशपांडे, रमा जोशी यांनी अभंग गायन केले. स्वागत सुनील सावंत, शिवाजी बांदल यांनी केले. प्रीती शेटे आणि दीपा सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे, मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×