पुणेसामाजिक

माणुसकी जिवंत आहे….उरण लोकलमध्ये प्रसूती, धाडसी महिला व इतरांच्या मदतीमुळे बाळ बाळंतीण सुखरूप 

उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा

Spread the love
काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या उरण लोकल प्रवासाला उरणकरांची दिवसेंदिवस पसंती वाढत चालली  आहे. मंगळवारी सकाळी ७:५० वाजता उरणहून सुटलेल्या लोकलच्या जनरल डब्यामध्ये रुग्णालयात जात असताना  एका महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या, आणि एकच धावपळ सुरु झाली. डब्यामधील पुरुषांनी आडोसा केला आणि त्यातील एका प्रवाशी महिलेने मदतीचा हात पुढे केला. यातूनच एका गोंडस बाळाचा जन्म झाला. निकिता देवेंद्र शेवकर या प्रवाशी महिलेने केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. निकिताचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या घटनेत उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
प्रसूती झालेल्या बाळाला इन्फेक्शन होऊनये या विचाराने इतर कोणत्याही गोष्टीचा वापर न करता हातानेच बाळाला साफ केले. निकिता शेवेकर या महिलेने तात्काल पुढकार घेऊन बाळ आणि बाळंतीणीला आधार दिला. तर एका गृहस्थाने स्थानकामध्ये गाडी थांबताच धावात जाऊन मोटारमनाला याची कल्पना दिली. यावेळी मोटारमन महेंद्र म्हात्रे यांनी सहकार्य करत नेरुळ स्टेशन येथे तात्काळ रुग्णवाहिकेची सोय करून, महिला आणि तिच्या बाळाला रुग्णालायात नेण्याची व्यवस्था केली.
या सर्व प्रकारामध्ये उरण हनुमान कोळीवाडा गावातील निकिता देवेंद्र शेवेकर या महिलेने प्रसूत महिला आणि तिच्या बाळाला जे सहकार्य केले ते वाखाडण्याजोगे होते. या महिलेने केलेल्या कामामुळे माणुसकी जिवंत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  निकिता शेवेकर यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीची दखल उरण तालुका मराठी पत्रकार संघाने घेत त्यांचा उरण रेल्वे स्टेशन येथे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सदर बाळंतीण आपल्या पतीसह मंगळवार दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून आमच्याकडे सुविधा नसल्याने तुम्ही पेशंट त्वरित हलवावा असे सांगितले. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना अंब्युलन्समध्ये नेणे अत्यावश्यक होते. परंतु याकडे उपस्थित डॉक्टरांनी लक्ष न दिल्याने हवालदिल झालेल्या पतीने आपल्या ऍक्टिव्हा बाईकवर उरण रेल्वे स्टेशनला जाऊन लोकलने पुढील प्रवास केल्यानंतर सदरची घटना घडली असल्याची माहिती महिलेच्या पतीने पत्रकारांना दिली.
याबाबत पत्रकारांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता मस्टरमध्ये महिलेची नोंद आढळून आली. या घटनेत जर विपरीत घडले असते तर जबाबदारी कोणी घेतली असता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत रुग्णालयाचे मेडिकल सुपेरिन्टेंडेंट (Medical Superintendent )डॉ. बाबासो काळेल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे चुकीचे असल्याचे कबूल करून आपण याची माहिती घेतो असे सांगितले.
यापूर्वी उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात अनेक व्याधीवर उपचार होत होते. तसेच महिन्याला ४० च्या वर प्रस्तुती होत असल्याची नोंद आहे. आता मात्र उपचारासाठी ऍडमिट करून घेण्याऐवजी पुढील रुग्णालयात हलविण्यास सांगून आपली जबाबदारी येथील डॉक्टर मंडळी झटकत असल्याचे दिसते. आता तर रुग्णालयात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत बाळंतपण होतात तसेच रात्रीच्यावेळी डॉक्टर हजर नसतात अशी माहिती अधिकृत सूत्रानी दिली.
उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील या गलथान कारभाराची व महिलेच्या या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने डॉ. काळेल यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×